Login

"काय माझा गुन्हा...?" भाग ३९

सामाजिक
दिर्घ कथा लेखन स्पर्धा...
डिसेंबर व जानेवारी...२०२५-२०२६


"काय माझा गुन्हा...?" भाग ३९


तेव्हा माधव बोलतो...
“मी माधव… गौरवीचा मित्र..."
असं बोलून तो घरात येतो नम्रपणे वाकून त्यांना नमस्कार करतो...

आणि क्षणभर थांबून तो पुढे म्हणतो…
“आणि… तिच्याशी लग्न करण्याची इच्छा घेऊन आलोय…”

गौरवीचे वडील त्याला बसायला सांगतात...

तेवढ्यात किचनमधून गौरवीची आई पाण्याने भरलेले ग्लासांचा ट्रे घेऊन बाहेर येते तेव्हा ती आश्चर्याने पाहत विचारते…
“एकटाच आलास…? तुझे आईवडील नाही आलेत का…?”

तेव्हा माधव शांतपणे उत्तर देतो…
“मला वडील नाहीत... हा पण माझ्या घरी माहिती आहे… पण मला वाटलं… पहिल्यांदा मी स्वतः यावं… स्वतः बोलावं… आणि
स्वतः जबाबदारी स्वतः घ्यावी…”

घरात क्षणभर शांतता पसरते… वडील खुर्चीत बसतात… आणि त्यांचा  आवाज गंभीर होतो…
“नाव काय म्हणालास…?”

“माधव देशमुख…” तो स्पष्टपणे सांगतो…

हे संपूर्ण नाव ऐकताच गौरवीच्या आईवडिलांची नजर बदलते…

आई हळूच पण भीतीने विचारते…
“देशमुख… म्हणजे…?”

माधव क्षणभर थांबतो…
“हो… मी तथाकथित ‘उच्च जाती’त जन्मलो आहे…”

आईचा आवाज आता स्पष्टपणे कडक होतो…
“आणि आमची मुलगी… तुला माहिती आहे ना… कोणत्या घरात जन्मली आहे ती…?”

माधव थेट डोळ्यात पाहून म्हणतो…
“माहिती आहे… आणि म्हणूनच आलोय…”

गौरवीचे वडील चिडून उठतात…
“मग तरीही…? लोक काय म्हणतील…? तुमचा समाज काय बोलेल…? आपली इज्जत…?”

माधव शांत पण ठाम आवाजात बोलतो…
“काका… ज्या समाजाला आजही माणसाची किंमत
आडनावावरून ठरवायची आहे… त्या समाजापेक्षा
मला माझी माणुसकी मोठी वाटते…”

गौरवीची आई तडकाफडकी म्हणते…
“हे सगळं बोलायला सोपं असतं… पण उद्या लग्न झाल्यावर…
तुझ्या घरात… तुझ्या लोकांमध्ये… तिचा श्वासही मोजला जाईल…”

माधव क्षणभर गप्प होतो… मग हळूच म्हणतो…
“म्हणूनच… मी आज एकटाच आलोय… तिच्या पाठीशी उभं राहायला कोणाची परवानगी लागत नाही हे मी आधी दाखवायला आलोय…”

वडील थकलेल्या आवाजात म्हणतात…
“पण आम्ही आमच्या मुलीला आगीत ढकलू शकत नाही…”

माधव डोळे खाली घालत म्हणतो…
“मी आग नाही… मी तिच्यासोबत चालणारा माणूस आहे…”

आई थोडीशी नरम होते… पण तरीही म्हणते…
“हे लग्न आम्हाला मान्य नाही…”

माधव शांतपणे मान झुकवतो… आणि हळूच बोलतो...
“माझं येणं नकार ऐकण्यासाठीच होतं…”

मग तो गौरवीच्या आईवडिलांना बोलतो...
“एक विनंती आहे… गौरवीला दोष देऊ नका… तिनं काहीच चुकीचं केलेलं नाही…”
असं बोलून तो दाराकडे वळतो… आणि तो निघून जातो…
आणि दार बंद होतं…




क्रमशः....

©® प्राची कांबळे (मिनू)


"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही."


0

🎭 Series Post

View all